नागपूर - शहरातील दवलामेटी परिसरात 5 वर्षीय बालकाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. आर्यन राऊत असे मृत बालकाचे नाव आहे. तो काल संध्याकाळ पासून बेपत्ता होता. आज सकाळी आर्यनचा मृतदेत समाजभवनासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात आढळून आला आहे. या संदर्भात पुढील तपासाला पोलीसांनी सुरुवात केली आहे.
आर्यन राऊत हा 5 वर्षीय चिमुकला सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून घराजवळील खेळाच्या मैदानाजवळून बेपत्ता झाला होता. बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याचे शोध घेतला. नागरिकांनी देखील आर्यनला शोधण्यासाठी संपूर्ण दवलामेटी परिसर पिंजून काढला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यानंतर वाडी पोलीस स्टेशनमध्ये आर्यन हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी सुद्धा त्याचा शोध घेतला.
मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह परिसरातील ग्राम पंचायती कडून सुरू केलेल्या समाजभवन निर्माण कार्य सुरु असलेल्या जागी सापडला आहे. समाजभवन बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सध्या पावसाचे पाणी भरले असल्यामुळे त्यात पडून आर्यनचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या संदर्भात तपासाला सुरुवात केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.