नागपूर- सोमवारी नागपुरात तब्बल ४९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हजाराच्या पुढे गेला आहे. सध्या नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण आकडेवारी १ हजार ४३ इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने प्रशासनाने त्यांना आधीच क्वारंटाईन केलेल होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या रुग्णांमध्ये बहुतांश संशयित हे पचपावली येथील विलगिकरण केंद्रातील आहेत. याशिवाय सोमवारी ३३ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनवर विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णाचा आकडा ६५० इतका झाला आहे. नागपुरात सोमवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा १७ झाला आहे.
केवळ शहरी भागच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढत आहे. शहरातील सतरंजीपुरा, मोमीनपूर, नाईक तलाव-बांग्लादेश, डोबी नगर या भागांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. सध्या नागपुरात सुमारे ३७६ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याने, चिंता वाढलेली आहे. त्यात रोज नवीन रुग्णांची भर पडत असल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे देखील वाढतच आहेत.