नागपूर - आर्थिक भार कमी करण्यासोबतच दर्जेदार शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांची संख्या ही ३०० च्यावर आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत समायोजन करून या शाळा बंद करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे.
राज्यात मागील वर्षी १ हजार ३०० शाळा बंद केल्यानंतर हा आकडा या वर्षी ५ हजारपर्यंत जाणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये १ हजार ५०० शाळा असून जिल्ह्यात ४ हजार ३०० शिक्षक कार्यरत आहेत. पटसंख्या नसलेल्या शाळांमध्ये शिक्षक आणि सर्व शिक्षा अभियानाचा खर्च हा १५ लाखांवर जातो, त्यामुळे या शाळा बंद करुन खर्च बचतीचा प्रशासनाचा निर्णय आहे. मात्र, अतिदुर्गम भागात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत, अशा भागतील विद्यार्थी या निर्णयामुळे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.