नागपूर - राज्य सरकारने २०१९ पर्यंत महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, अपुऱ्या पावसामुळे आणि दुष्काळाच्या परिस्थितीमुळे राज्यात टँकर सुरुच आहेत. विदर्भातील २१० गावांसाठी २२३ पाण्याचे टँकर्स पुरवण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त महापालिकेच्या क्षेत्रात देखील टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या राज्यभरातील ३ हजार ५५५ गावाची तहान सुमारे साडेचार हजार टँकर्सने पाणीपुरवठा करून भागविली जात आहे. अपुऱ्या पावसामुळे आणि पाण्याच्या नियोजन शुन्यतेमुळे पुन्हा एकदा राज्यावर टँकरने पणापुरवठा करण्याची वेळ आली आहे.
काही भागात टँकर्सच्या पाण्याचा गैरवापर होत असून पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. टँकर्सवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीआरएस यंत्रणा लावण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही घोषणा कागदावरच राहिली आहे.