नागपूर - कामठी येथे कन्हान नदीत पोहायला गेलेल्या 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. प्रवेश प्रवीण नागदेवे (वय 14) आणि अजेश अतुल नितनवरे (वय 13) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. दोन्ही मुलं 9 व्या वर्गात शिकत होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यामुळे कामठीच्या हरदास नगरातील काही विद्यार्थ्यांनी नदीकडेच्या परिसरात फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यावेळी प्रवेश आणि अजेय या दोन्ही मुलांना नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यावेळी ते महादेव घाट येथे पाण्यात उतरले. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने बुडून त्यांच्या मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाताच जुनी कामठी पोलिसांनी शोधमोहिमेद्वारे दोघांचेही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.