नागपूर - येत्या 8 डिसेंबरपासून नागपुरात विधानपरिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत विधिमंडळ कर्मचारी वसाहतीतील 160 खोल्यांचे गाळे रिकामे करण्याच्या नोटीस त्या ठिकाणी राहत असलेल्या कुटुंबांना देण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी राहत असलेल्या अनेक कुटुंबांना दरवर्षी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या महिनाभरापूर्वी आणि अधिवेशनाची सांगता झाल्याच्या महिनाभरानंतर म्हणजेच सुमारे तीन महिने आपले क्वार्टर सोडून अन्य ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहायला जावे लागेल. मात्र, कोरोना महामारीच्या काळात आता जायचे कुठं? हा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
नागपूरच्या रवी नगर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत 160 खोल्यांचे गाळे आहे. या गाळ्याचा उपयोग दरवर्षी हिवाळी अधिवेशनाकरिता राज्याच्या विविध भागातून नागपूरला येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याकरीता केला जातो. एरवी याठिकाणी इतर कर्मचारी कुटुंबासह वास्तव्यास असतात. मात्र, पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर ज्यावेळी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाते त्या दिवसापासून या गाळ्यात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अस्थायी स्वरुपातील नव्या घराचा शोध सुरू करावा लागतो.
मुळात या कर्मचाऱ्यांचा दहा महिन्यांच्या करारावरच इथे राहण्याची परवानगी दिली जाते. त्यानंतर ज्यावेळी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू होते त्यावेळी या कर्मचाऱ्यांना घर रिकामे करण्याची नोटीस दिली जाते. हा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या संकटात भाड्याचं घर द्यायला कुणी तयार नसल्याने या 160 कुटुंबांसमोर निवारा कुठे शोधायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूरमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशनाचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनामुळे अनेक ठिकाणी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. मात्र, अधिवेशनाची गरज लक्षात घेता ते देखील रिकामे करण्याच्या संदर्भांत संबंधित विभागांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रविभवन आणि आमदार निवासाचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात नागपूरात होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात यावे, तसेच त्यातून जो निधी वाचणार आहे ते पैसे नागपुरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयोगात आणले जावे, अशी मागणी जोर धरत आहे.