मुंबई : शहराच्या ओशिवरा भागात गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव मर्सिडीज गाडीने या तरुणाच्या दुचाकीला समोरुन धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. सतीश गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. तो झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीसाठी काम करत होता. अपघातानंतर तरुणाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सोनू सूदने केली विचारपूस..
अभिनेता सोनू सूदने या तरुणाच्या कुटुंबीयांची विचारपूस केली आहे. तसेच, संपूर्ण मदतीचे आश्वासनही दिले आहे. यासोबतच, सूद यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणाता लवकरात लवकर तपास करण्यास सांगितले असल्याची माहिती गुप्ताच्या कुटुंबीयांनी दिली.
मर्सिडीजची भीषण धडक; दुचाकी चक्काचूर..
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही मर्सिडीज अत्यंत वेगात येत होती. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने समोरील दुभाजकालाही ओलांडून ही गाडी रस्त्याच्या पलीकडून जाणाऱ्या दुचाकीला धडकली. या धडकेमध्ये दुचाकाची चक्काचूर झाला असून, दुचाकीस्वाराचे हेल्मेटही चक्क गाडीच्या सांगाड्यात अडकून राहिले होते.
मद्यधुंद चालकावर कारवाई करा..
मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवल्यामुळेच हा अपघात झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी चारचाकीतील सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी तरुणाच्या मामाने केली आहे. कारमधील लोक श्रीमंत घरातील असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कितपत कारवाई केली जाईल याबाबत शंकाच आहे. मात्र, एका आईने आपला तरुण मुलगा गमावला आहे हे लक्षात घेऊन पोलिसांनी तपास करावा असेही ते यावेळी म्हणाले.
एक ताब्यात, पुढील तपास सुरू..
पोलिसांनी या अपघातानंतर पंचनामा करत मर्सिडीज गाडी ताब्यात घेतली आहे. तसेच, चालकालाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.