मुंबई - शहरातील झवेरी बाजारातील दुकानांचे शटर तब्बल दोन महिन्यांनी उघडण्यात आले. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व कारागीर घरी गेल्याने बाजारात कारागिरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात आर्थिक नुकसान देखील झाले. त्यामुळे याचा सोन्याच्या उद्योगावर परिणाम होणार असल्याचे व्यापारी सांगतात.
झवेरी बाजार हा देशातील सर्वात मोठा सराफा बाजार आहे. या बाजारपेठेतून सोन्याची निर्यात होते. तसेच दररोज १८० ते २०० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, कोरोनाने देशात थैमान घातले आणि लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे ही बाजारपेठ देखील बंद झाली. जवळपास ७० दिवसांपेक्षा अधिक काळ बाजारपेठ बंद असल्याने जवळजवळ १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सराफा व्यापारी सांगतात. यापूर्वी या बाजारात जवळपास साडेचार ते पाच लाख मजूर काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने मजूर आपआपल्या गावी परत गेले. आजपासून झवेरी बाजारातील सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येताना दिसले. तसेच सर्व दुकानदार सरकारी नियमावलीप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करत होते. मात्र, आता फक्त ३० ते ४० हजार कारागिर याठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे इतक्या कमी कामगारांमध्ये काम होईल का? असा प्रश्नही बाजारातील व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक नुकसान आणि आता लॉकडाऊनंतर कारागिरांचा तुटवडा, अशी दुहेरी समस्या सराफा व्यापाऱ्यांना भेडसावत आहे. या सर्वाचा परिणाम सोन्याच्या उद्योगावर होण्याची शक्यता असल्याचे सराफा व्यापारी सांगतात.