मुंबई : माटुंगा रेल्वेच्या कारखान्यामध्ये मागील महिनाभरात किमान पाच ते सहा वेळा काम करत असताना अंगावर मशीन पडून अपघात झाला होता. मात्र, त्यावेळेला कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. परंतु, 16 जानेवारी रोजी सकाळी कामगार कृष्ण मोहन वर्मा (वय 36 वर्षे) याने बळजबरीने काम करण्यास नकार दिला. मात्र तरीही वरिष्ठांकडून त्याला अवजड मशीनवर काम करायला भाग पाडले गेले. काम करताना संबंधित कामगाराला मशीनचा धक्का लागून तो खाली पडला आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला.
दबावाखाली काम घेतल्याचा आरोप : कामगार संघटनेने घटनेपूर्वी रेल्वे प्रशासन, कारखानदार आणि वरिष्ठ अभियंत्याकडे अपघाताची शक्यता वर्तविली होती. याबाबत लेखी निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही असे रेल्वे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी माटुंगा मध्य रेल्वे कारखान्यामध्ये कामगार कृष्ण मोहन वर्मा याने सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे काम न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यापूर्वी येथे अपघाताच्या पाच ते सहा घटना झाल्या होत्या आणि त्यामध्ये काही कामगारांना इजा झाली होती. त्यामुळे आपल्याला देखील गंभीर इजा होऊ शकते याची भीती त्याच्या मनात होती. परंतु, वरिष्ठांनी त्याला त्या ठिकाणी दबावाने काम करायला लावल्याचा आरोप रेल्वे कामगार संघटनेचे कॉम्रेड कृष्णा वेणू नायर यांनी ईटीव्ही सोबत बोलताना केला.
सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष ? : कॉम्रेड कृष्णा वेणू नायर यांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखानाच्या वरिष्ठांना मागील अपघाताच्या वेळेस यंत्रातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याबाबत सांगण्यात आले होते. सद्यस्थितीमुळे एखाद्या कामगाराचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, कामगारांना बळजबरीने कामाला लावू नका. यासंदर्भातील सुरक्षेचे उपाय तातडीने अंमलात आणावे असे सुचविण्यात आले होते. अन्यथा होणाऱ्या अपघाती मृत्यूला रेल्वे कारखान्याचे वरिष्ठ जबाबदार राहतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने कामगार कृष्ण मोहन वर्मा याला जीव गमवावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एका तरुण युवकाचा काम करत असताना मृत्यू झाल्याने शेकडो कामगारांनी एकत्र येऊन रेल्वे कारखान्याच्या वरिष्ठांविरोधात आंदोलन केले.
हेही वाचा : Mumbai News : मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षासह टॅक्सीवर दंडात्मक कारवाई होणार