मुंबई - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख करोडच्या पॅकेजचे अपयश आणि त्यासाठीची वस्तूस्थिती प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी समोर आणून केंद्राच्या या पॅकेजचे पितळ उघडे पाडले आहे. राज्यातील शेतकरी केंद्राच्या पॅकेजपासून कोसो दूर असल्याने ही घोषणा पोकळ होती, असा दावा तांबे यांनी केला आहे. तांबे यांच्या संकल्पनेतून 'कहां गये वो 20 लाख करोड?' हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून सोमवारी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेताच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांना 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून काही मिळाले का, याची माहिती घेतली. त्यावेळी असंख्य शेतकऱ्यांना या पॅकेजचा कोणताही लाभ मिळाला नसल्याचे दिसून आल्याचे तांबे म्हणाले.
या राज्यव्यापी आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्याला या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा लाभ झाला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रातील भाजप सरकारकडून आम्ही अपेक्षाच करायचे सोडले आहे. भाजपने नेहमीच शेतकऱ्यांची निराशा केली आहे? असा शेतकऱ्यांचा एकूण सूर होता. यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. यापुढे दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का? नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.