मुंबई - केंद्र सरकारने शुक्रवारी जाहिर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशातल्या तरुणांना भरीव असे काहीही मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया तरुण उद्योजक अमोल मेश्राम यांनी दिली आहे. केंद्र सरकारने मागील काळात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी तरुण उद्योजकांना प्रशिक्षण दिले, असे अर्थसंकल्पात सांगण्यात आले. परंतु, त्यातून प्रत्यक्षात प्रशिक्षणानंतर किती तरुण मुख्य प्रवाहात आले? आणि त्यांना त्यांचा लाभ मिळाला का? हा मोठा प्रश्न आहे.
शिवाय त्यातील किती जण कार्यरत आहेत. हे कोणत्याही आकडेवारीवारून स्पष्ट होऊ शकले नाही, तर दुसरीकडे मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत १५.५६. करोड लोकांना ७ लाख करोड रूपयांपेक्षा जास्त कर्ज वाटप करण्यात आले, असे ही अर्थसंकल्पात सांगण्यात आले. त्याची सरासरी काढली असता ४६ हजार रूपये प्रति व्यक्ती होते.
या इतक्या कमी रुपयात उद्योजक तयार होणे शक्य नाही. सरकारने हा अर्थसंकल्प सादर करताना यापैकी एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना वितरीत केलेल्यांची आकडेवारी दिली नाही. या प्रवर्गातील किती आज उद्योजक म्हणून उदयास येत आहेत. याचीही आकडेवारी देण्यात आली नाही. यामुळे यातून तरुणांची फसवणूक झाली आहे. शिवाय नोकरी शोधणारे तरुण आता नोकरी देणारे झाले आहेत. देश जगातला मोठा 'स्टार्टअप हब' झाला आहे, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले. त्यांचे हे विधान खरे वाटत नसल्याचे मेश्राम यांनी यावेळी सांगितले. देशात मागील ३ वर्षात बेरोजगारी वाढली आहे. शासनाची भरती प्रक्रिया मंदावली आहे, अशा स्थितीत जो गाजावाजा करण्यात आला आहे, ती तरुणांसाठी धूळफेक वाटते, असे मत मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.