मुंबई Year Ender 2023 : जून २०२२ मध्ये शिंदे गटानं शिवसेनेतून बंड करत, भाजपासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही निवडणूक आयोगानं शिंदेंच्या शिवसेनेला दिलं आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या कारणावरुन शिंदे गट-ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं सर्वांनी पाहिलं. सत्ता आणि पैसा तिकडेच कार्यकर्त्यांचा कल असल्याचं मागील वर्षभरात दिसून आलं आहे. वर्षभरात ठाकरे गटातील अनेक दिग्गजांनी ठाकरे गटाला राम-राम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. घेऊया वर्षभरातील यासंदर्भातील घटनांचा धावता आढावा.
दोन्ही गटातील वर्षातील महत्त्वाच्या 10 घडामोडी :
आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी : शिवसेनेतून शिंदे गटानं बंड केल्यानंतर ठाकरे गटानं शिंदे गटातील १६ आमदार अपात्र असल्याचं म्हणत, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी घेताना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असं सुप्रीम कोर्टानं म्हणत निर्णयाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलावला. यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या प्रकरणावर निर्णय घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले होते. मात्र त्यानंतर आणखी १० दिवस वाढवून दिल्यामुळे आता या सुनावणीचा निर्णय १० जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.
शिवसेना धनुष्यबाण आणि चिन्ह यावर संघर्ष : खरी शिवसेना आमचीच आहे असा दोन्हीकडून दावा करण्यात आला. शिवसेना धनुष्यबाण आणि चिन्ह आम्हालाच मिळावे यासाठी दोन्ही गट २०२२ च्या वर्षाअखेर निवडणूक आयोगाकडे गेले. अनेक कागदपत्रं, पुरावे दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला सादर करावे लागले. परंतु या दरम्यान, शिवसेना धनुष्यबाण आणि चिन्ह आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप, संघर्ष आणि चुरस पाहायला मिळाली.
निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय : शिवसेना धनुष्यबाण आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या लढाईत १७ फेब्रवारी २०२३ रोजी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला. राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर ८ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला गेला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने शेण खाल्लं.
दिग्गजांचा ठाकरे गटाला रामराम : जिकडे सत्ता आणि पैसा असतो तिकडेच कार्यकर्ते आणि नेत्यांचा कल असतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण शिंदे गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर 40 आमदार आणि 13 खासदार असा मोठा गट शिंदे गटाला मिळाला. यानंतर ठाकरे गटातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखील राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. हळूहळू ठाकरे गटातील दिग्गजांनी देखील उबाठा गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. यात वरिष्ठ नेत्या व विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत, शिंदे गटाला पसंती दिली. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता.
उबाठा आणि वंचितची युती : ठाकरे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वंचितला एकत्र येण्यासाठी हाक दिली. आगामी मुंबई महानगपालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर उबाठा गटाने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली. आपल्या पक्षाला जास्तीत जास्त लोकांची ताकद मिळावी. निवडणुकीत आपले अधिकाधिक उमेदवार निवडून यावे यासाठी वंचितसोबत युती करुन उद्धव ठाकरेंनी रणनीती आखल्याचे बोलले जाते.
दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गट आमनेसामने : मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे टाकल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी शिंदे गटाने बीकेसी येथे दसरा मेळावा साजरा केला होता. तर शिवाजी पार्क येथे ठाकरे गटाचा दसरा मेळावा झाला होता. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा व्हावा यासाठी ठाकरे गटाने पालिकेत अर्ज दाखल केला होता. याला पालिकेकडून हिरवा कंदिल मिळाला. तर शिंदे गटाने आझाद मैदानात दसरा मेळावा साजरा केला. परंतु दसरा मेळाव्यावरुन पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तू तू मै मै आणि यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले.
दिशा सलियान, आदित्य ठाकरे आणि एसआयटी : दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची सेक्रटरी दिशा सालियान हिचा मृत्यू झाला नसून, तिची आत्महत्या असल्याचं भाजपाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र म्हणत आहेत. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी मागील हिवाळी अधिवेशनात भाजपाकडून करण्यात आली होती. दरम्यान, यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना करण्यात येईल, तसंच या प्रकरणाची सखोल एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असे आदेश दिले. यामुळं आमदार आदित्य ठाकरेंच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
राज-उद्धव एकत्र येणार महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, ही लोकांची भावना आहे. परंतु हे दोघेही आपापल्या मतावर, भूमिकेवर ठाम असल्यामुळे हे दोघे एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे, असे असताना पालिकेतील भ्रष्टाचारावरून मनसे उबाठा गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सध्या उबाठा गटाची झालेली वाताहात पाहता, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी हात मिळवणी करावी अशी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे. या वर्षाअखेर ठाकरेंच्या परिवाराच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली, हस्तांदोलन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, राज-उद्धव भविष्यात एकत्र येणार का? अशा चर्चांना जोर धरू लागला आहे.
मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री अडचणीत - सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे-पाटील यांनी रान पेटवलं आहे. त्यांनी राज्यभर दौरा करत, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी केली आहे. जालन्यातील आंतरवाली-सराटी येथे जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यानंतर मराठा समाज संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा असून, आरक्षण का मिळू शकत नाही. मुख्यमंत्री आरक्षणासाठी पुढाकार का घेत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले गेले. यामुळं मराठा आरक्षणामुळं सरकार आणि मुख्यमंत्री अडचणीत सापडल्याचं चित्र दिसलं. या सर्व धरतीवर मी मराठा आहे, मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी शपथ दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन घेतली.
दोन्ही गट अनेक कारणावरुन आमनेसामने : २०२३ या वर्षभरात ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्ते अनेक कारणावरून आमने-सामने आले. सुरुवातीला पक्षाचे नाव चिन्ह यावरून दोन्ही गटातील वाद आणि कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला मिळाले. तसंच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोब्हेंबर या स्मृतीदिनी स्मृतीस्थळावर दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मुंब्र्यात शिंदे गटाने ठाकरे गटाची शाखा पाडल्यावरून दोन्ही गटातील कार्यकर्ते भि़डल्याचे दिसले. वर्षभरात असंख्य कारणावरून दोन्ही गटातील कार्यकर्ते, नेते एकमेकात चांगलेच भिडल्याचे वर्षभरात पाहायला मिळाले. खासकरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जे आरोप करताहेत, त्याला शिंदे गटाकडून जशाच तसे प्रतिउत्तर मिळत आहे.
हेही वाचा :