मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या शितल मात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात शिवसेनेचे माहीम विधानसभेचे उपविभागप्रमुख यशवंत विचले यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हात्रे यांचा पाठलाग केल्याप्रकरणी यशवंत विचले यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींना न्यायालयीन कोठडी : दहिसर येथील शिंदे सेनेच्या आशीर्वाद यात्रेत आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्री पेजवर ही क्लिप वायरल झाल्याने शितल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसेनेचे सोशल टीमचे साईनाथ दुर्गे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याशिवाय पुणे आणि इतर भागातून ५ शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाने सर्वांना कोठडी सुनावली आहे.
पाठलाग केल्याची तक्रार : दादर येथील शिवाजी पार्क ते कीर्ती कॉलेज दरम्यान १३ मार्चला दोन अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी दाखल केली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने अनोळखी व्यक्तींची ओळख पटवून चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी तपासणीअंती दोघांना ताब्यात घेतले होते. माहीम विधानसभेचे उपविभाग प्रमुख यशवंत विचले यांचा यात समावेश होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना आठवडाभराची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सीआयडी चौकशीचे आदेश : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शितल म्हात्रे प्रकरणाचे तीव्र पडसाद म्हटले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी लावण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षाने या विरोधात जोरदार आवाज उठवत संबंधित व्हिडिओ मार्च असेल तर ओरिजिनल व्हिडिओ जाहीर करण्याचे आवाहन सरकारला केले. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुरू असलेली धरपकड चुकीची असल्याचे म्हटले. तसेच पोलिसांच्या कारवाईमुळे शिवसैनिक आणि दहिसर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन छेडले होते.