मुंबई - महानगरपालिकेच्या करदात्या मुंबईकरांना आवश्यक त्या सर्वसोयी-सुविधा विनाविलंबमिळतील याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील. मागील वर्षापेक्षा यावर्षी जोमाने काम करू, असे आश्वासन स्थायी समिती अध्यक्षपदी फेरनिवड झालेले यशवंत जाधव यांनी दिले.
मुंबई महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्यास्थायी समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर जाधव म्हणाले, मुंबईतील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छता, मलनिस्सारण व्यवस्था, आरोग्यसेवा, रस्ते व वाहतूक यांचे नियोजन, शैक्षणिक सोयी-सुविधा, अशा नागरी सुविधांकडे कटाक्षाने लक्ष पुरविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेनेदेखीलकरदात्या मुंबईकरांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा विनाविलंब मिळतील याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
लोकांच्या कामासाठीच आम्ही भांडत असतो -
स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मागील वर्षभरनागरी समस्या सोडवण्याचे काम करत राहिलो. मागील वर्षभराच्या कालावधीत अनेक नागरी सुविधा देण्याचे काम केले. अनेक प्रकल्प सुरू केले तर काही मार्गी लावले. यावेळी मित्रपक्ष भाजपबरोबर काही वैचारिक मतभेद झाले. मतभेद झाले याचा अर्थ काम बंद करणे, अडथळे आणणे, असा होत नाही. लोकांच्या कामासाठीच आम्ही भांडत असतो. भांडताना वैचारिक गोष्टी घडत असतात, असे जाधव म्हणाले.
नाईक, परब, पाटणकर यांची नियुक्ती -
शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी अंजली नाईक, सुधार समितीच्या अध्यक्षपदी सदानंद परब, बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी अनिल पाटणकर यांची नव्याने निवड करण्यात आली. तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नव्याने निवड झालेल्या आणि फेरनिवड झालेल्या अध्यक्षांची नावे जाहीर केली.