मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी ( Businessman Mukesh Ambani ) यांच्या अँटिलिया घरासमोरील वाहनात बॉम्ब प्रकरणात आरोपी असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Suspended police officer Sachin Waze ) यांनी तळोजा कारागृहातील पोलीस सुरक्षकांसोबत गैरवर्तणूक केल्या प्रकरणात तळोजा कारागृहाने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टा मध्ये लेखी तक्रार दाखल केली असून या पत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सचिन वाझे यांना दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
तुरुंगात गैरवर्तन केल्याचा आरोप : तळोजा कारागृहाने बडतर्फ मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर तुरुंगात गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तुरुंग प्रशासनाने एनआयए न्यायालयात लेखी तक्रार केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाझे याने कारागृहातील सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन केले आणि त्यांना धमकावले. कारागृह अधिकाऱ्यांनी दावा केला की गेल्या आठवड्यात वाझे यांनी सुरक्षारक्षकांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्याचे सांगितले.
कारागृहाच्या रक्षकांनी धुडकावून लावली सचिन वाझे यांची विनंती : सचिन वाझे यांची विनंती कारागृहाच्या रक्षकांनी धुडकावून लावली. यानंतर सचिन वाझे संतापले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सचिन वाझे यांनी कारागृह अधीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि रक्षकांना धमकावले. सचिन वाझे यांचे हे वर्तन पाहून कारागृह प्रशासनाने विशेष न्यायालयाला पत्र लिहून माजी पोलीस अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाची माहिती दिली. यानंतर सचिन वाझे यांनी आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली आहे..
दिल्ली उच्च न्यायालयाने दिला मोठा दणका : त्याचवेळी विशेष न्यायालयाने आता सचिन वाझे यांच्या वकिलाला या पत्राचे उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला होणार आहे. ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरण यांची हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी 13 मार्च 2021 रोजी अटक झाल्यापासून सचिन वाझे तळोजा तुरुंगात आहे. गेल्या महिन्यात सचिन वाझे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला होता. अँटिलियाच्या निवासस्थानाबाहेर वाहनात बॉम्ब ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांच्यावर UAPA अंतर्गत खटला चालवण्यास आव्हान देणारी सचिन वाझे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल : सचिन वाझे यांनी अँटिलिया प्रकरणात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास आव्हान दिले होते. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने सांगितले की ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे. सचिन वाझे यांनी दावा केला होता की हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. कारण यूएपीए अंतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. यापूर्वी केंद्राने सचिन वाझे यांच्या याचिकेला विरोध केला होता. त्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला मान्य नसल्याचे केंद्राने म्हटले होते. हे संपूर्ण प्रकरण मुंबईत घडले असल्याने ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात यावी असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते.
काय आहे प्रकरण : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.