मुंबई : आज जागतिक क्षय दिवस आहे. मुंबई पालिकेच्याच आकडेवारीतून असे समोर आले की, टीबी या आजाराची लागण होण्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. तीन वर्षात ७५ हजार ०३४ महिलांना तर ६८ हजार ५१० पुरुषांना टी बी झाल्याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबई क्षयरोग मुक्तीसाठी पालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. २०२५ पर्यंत मुंबई टीबी मुक्त करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.
५२ टक्के नातेवाईकांना टीबी : मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात क्षय रुग्णाचे प्रमाण कमी आहे. टीबी हा आजार प्रामुख्याने प्रौढांना होण्याची शक्यता अधिक असते. एचआयव्हीची लागण झालेल्या, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या तसेच कुपोषित लोकांना टीबी होण्याचा धोका तीन पट अधिक असतो. टीबीचे निदान झालेल्या रुग्णांमुळे ५२ टक्के नातेवाईकांना टीबीची लागण होते असे या आकडेवारीतून समोर आले आहे.
महिलांची संख्या अधिक : टीबी हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या तीन वर्षात ७५ हजार ०३४ महिला तर ६८ हजार ५१० पुरुष रुग्णांना टीबी आजार झाला आहे. २०२० मध्ये १९ हजार ६१७, २०२१ मध्ये २६ हजार ७८८, २०२२ मध्ये २८ हजार ६२९ महिलांना टीबी आजार झाला आहे. तर २०२० मध्ये १८ हजार ३०३, २०२१ मध्ये २२ हजार ७५३, २०२२ मध्ये २७ हजार ४५४ पुरुषांना टीबी आजार झाला आहे. २०१८ ते २०२२ या ५ वर्षांत २ लाख ४३ हजार ७५१ टीबीचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ११ हजार ७६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
असे झाले मृत्यू : २०१८ ते २०२२ या कालावधीत ११ हजार ७६९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यात २०१८ मध्ये १८६०, २०१९ मध्ये २३८५, २०२० मध्ये २२८३, २०२१ मध्ये २७०५ तर २०२२ मध्ये २५६३ मृत्यू झाले आहेत. तर टीबीचे लक्षणे म्हणजे हलका, परंतु रात्री येणारा ताप, वजन कमी होते, भूक कमी लागते, बेडक्यातून रक्त पडते , थकवा जाणवतो, छातीत दुखते, रात्री घाम येतो, मानेला गाठी येतात.