मुंबई - मंगळवारी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, लेझिम, दिव्यांग दिंडी, सामूहिक विवाह सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने राज्यभरात करण्यात आले होते. त्याचाच हा आढावा...
पुणे - जिल्ह्यातील खेड पंचायत समितीतर्फे चाकण येथील छञपती शिवाजी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी, गीतगायन, नृत्यासह विविध कला सादर करत विद्यांर्थ्यांनी उपस्थितांवर छाप टाकली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना राजगुरु सोशल फाऊंडेशनतर्फे प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
सोलापूर - दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानावेळी तीन चाकी सायकल खरेदीत महानगरपालिकेने दिव्यांगाच्या खात्यातील निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला आहे. ३५०० रुपयांना मिळणारी सायकल ८५०० रुपयांना खरेदी केली गेली असे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी लाल बावटा कामगार युनियनच्या वतीने महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी झालेल्या जाहीर सभेत आडम बोलत होते.
बुलडाणा - शेगाव येथे श्री संत गजाजन महाराज विद्यालय आणि शहरातील इतर सामाजिक संस्थांच्या सहभागाने दिव्यांग दिंडी काढण्यात आली. या दिंडीत दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली कौशल्येदेखील सादर केली. स्थानिक मुरारका हायस्कुल येथून सुरु झालेल्या या दिंडीचा समारोप श्री. संत गजानन महाराज मंदिरात करण्यात आला.
हेही वाचा - दोन्ही हात नसतानाही पायांनी सुरेख चित्र काढणारी महिला
पालघर - जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून 'वंदे मातरम्' सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा थाटात पार पडला. आमदार श्रीनिवास वनगा यांनी सोहळ्यात मंगलाष्टके गायली. या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच दिव्यांग वधू-वर विवाहबंधनात अडकले. यावेळी, आमदार निरंजन डावखरे, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरच्या नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे आदी उपस्थितीत होते.
सांगली - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, समाजकल्याण विभाग आणि सांगली जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, दिव्यांग शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.