मुंबई - कोरोनासारख्या भयावह विषाणूचे संक्रमण जगभरात वाढ आहे. याचा फटका राज्यासह देशाला सुद्धा बसला आहे. केंद्र सरकारने या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २१ दिवसासाठी संपूर्ण भारत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, असंघटित क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सरकारने आमच्या असंघटित कामगारांकडे लक्ष द्यावे अशी मागणी भारतीय सेवा नाका कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
कामगार रोजच्या रोज काम करून आपले पोट भरतो. मात्र, हाताला काम नसल्या कारणाने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा वेळी शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांना २१ दिवसांची भरपाई आणि १ महिना पुरेल येवढे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
असंघटित क्षेत्रातील कामगार रिक्षा चालक, रंग कामगार, वीटभट्टी कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार, मच्छी बंदरावरील कामगार, यांची परिस्थिती बिकट आहे. अशा वेळी ते तोंडाला लावण्यासाठी मास्कदेखील विकत घेऊ शकत नाहीत. खबरदारी व जबाबदारी म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना जीवनावश्यक वस्तु व आरोग्यासाठी लागणारे वस्तु मोफत उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी भारतीय सेवा नाका कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नरेश राठोड यांनी केली आहे.
आपण एक नागरिक म्हणून या भयावह विषाणूचे संक्रमण वाढु नये, यासाठी कामगार वर्गानी घराबाहेर पडू नये, असे आव्हान भारतीय सेवा नाका कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. शासन आपल्याला मदत करेल हीच माफक अपेक्षा आम्ही करत आहोत, असेही भारतीय सेवा नाका कामगार संघटनेचे गणेश राठोड यांनी सांगितले.