मुंबई- महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी महिला व बालविकास विभाग नियोजनबद्धरित्या काम करेल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोविड योद्ध्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिलांच्या कल्याणासाठी खूप काम करणे आवश्यक असून महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात करायची आहे. महिला, बालके तसेच तृतीयपंथीयांच्या मागे ज्याप्रमाणे शासन उभे आहे, त्याचप्रमाणे समाजानेही उभे राहिले पाहिजे. अत्याचारग्रस्त बालके आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. बाल लैगिंक शोषण तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालायचा असेल तर तो गप्प बसून सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, अशा घटकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विभागाकडून आगामी काळात नियोजनबद्धरित्या काम केले जाईल, असेही ॲड.ठाकूर म्हणाल्या.
सदृढ बालक चळवळ गतिमान करणार
कोविड काळामध्ये माता-बाल पोषण, बालविवाह प्रतिबंध, आरोग्य आदी क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल तुम्हाला ‘हॅट्स ऑफ’ असे म्हणत ॲड. ठाकूर यांनी यावेळी पुरस्कारार्थींबद्दल गौरवोद्गार काढले. अंगणवाडी सेविकांनी माता-बालकांना पोषण आहार पोहोचविण्यासाठी मोठे काम केले, असेही त्या म्हणाल्या. सक्षम महिला, सदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र ही जन चळवळ गतीमान करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव
कार्यक्रमात जेजेआयएस मोड्यूलचे उद्घाटन, बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने बालकांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची जबाबदारी आपली या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, व्हीसीपीसीसाठी बाल संरक्षणाच्या अनुषंगाने माहितीचा समावेश असलेल्या चित्रफीती, पोस्टर्स आदी साहित्याच्या कीटचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच राज्यात कोविड कालावधीमध्ये विषेश काम केलेल्या आणि सेवा दिलेल्या महिलांचा गौरव, बालविवाह प्रतिबंध कामात विशेष कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांचा सत्कार, राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कोविडदरम्यान आपल्या प्राणांची पर्वा न करता कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या कोविड योद्ध्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा, मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांची उपस्थितीती होती.
हेही वाचा- बिहारच्या पराभवातून भाजपने काही तरी शिकावे, जयंत पाटील यांचा टोला