मुंबई - सायन-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सायन ते खारघर बोगदा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा बृहत आराखडा ही तयार करण्यात आला असून आता बांधकामाला सुरवात करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे. पण ही प्रक्रियाच एमएसआरडीसीला सुरू करता येत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकल्पासाठी आपल्याकडे पुरेसा निधीच नाही. या प्रकल्पासाठी सिडको आणि एमआयडीसीकडून काही निधी मिळणार आहे. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही अजून हा निधी न मिळाल्याने हा प्रकल्प रखडल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली आहे.
म्हणून प्रकल्प हाती -
ठाण्यावरून नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गाचा, तर सायन-पनवेल मार्गाचा वापर सध्या केला जातो. या रस्त्यावरुन अवजड वाहतूकही मोठ्या संख्येने होते. त्यामुळे या दोन्ही मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. यावर तोडगा काढण्यासाठी तुर्भे-खारघर हा 5.4 किमीचा बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला. तर गेल्या वर्षी या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर एमएसआरडीसीने या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यानुसार बृहत आराखड्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या टप्प्यावर हा प्रकल्प आहे.
प्रकल्प केवळ निधीअभावी रखडला -
या प्रकल्पाचा आराखडा तयार आहे. पण एमएसआरडीसीला पुरेसा निधी नसल्याने प्रकल्प पुढे नेता येत नसल्याचे चित्र आहे. कारण मुळ प्रस्तावानुसार, सरकारी तरतुदीनुसार 1222 कोटीच्या या प्रकल्पासाठी सिडकोकडून 300 कोटी, तर एमआयडीसीकडून 150 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने हा निधी लवकर मिळावा, यासाठी या दोन्ही यंत्रणाकडे कागदोपत्री पाठपुरावा सुरू केला आहे. पण अजूनही या दोन्ही यंत्रणाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. एकूणच निधीच मिळत नसल्याने हा प्रकल्प कसा सुरू करायचा, असा प्रश्न एमएसआरडीसीसमोर असून याच कारणामुळे प्रकल्प रखडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याविषयी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता, हा प्रकल्प केवळ निधीअभावी रखडल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
पैसे मिळेल तेव्हाच प्रकल्प सुरू करू -
आम्ही या दोन्ही यंत्रणाकडे पाठपुरावा करत आहोत. पण, आम्हाला आजूनही त्यांच्याकडून निधी मिळालेला नाही. तर, आमच्याकडे पैसेच नसल्याने आम्ही हा प्रकल्प पुढे नेऊ शकत नाही. जेव्हा या यंत्रणा पैसे देतील तेव्हाच हा प्रकल्प सुरू करू, अशी भूमिका ही एमएसआरडीसीने घेतली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करत 10 ते 15 मिनिटांचा वेळ वाचवणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य आता सिडको आणि एमआयडीसीच्या प्रतिसादावरच अवलंबून आहे.
असा आहे प्रकल्प -
तुर्भे-खारघर बोगदा प्रकल्प हा एकूण 5.4 किमीचा असून यापैकी 3.5 किमी उन्नत मार्ग, तर 2.5 किमीचा बोगदा आहे. याकरिता 1222 कोटींचा खर्च येणार असून यातील 300 कोटी सिडकोकडून, तर 150 कोटी एमआयडीसी देणार आहे. तसेच उर्वरित निधी एमएसआरडीसी उभारणार उभारणार आहे. हा आठ पदरी प्रकल्प असून याकरिता बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. आता निविदा प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे.