मुंबई : राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा सुरू आहे. 8 मार्च महिला दिनाच्यानिमित्ताने या अधिवेशनात महिला आमदारांना दिवसभर आपले प्रश्न मांडण्याची आणि बोलण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आमदारांना किती प्रमाणात आपले प्रश्न मांडता आले. किती वेळा बोलण्याची संधी मिळाली. आमदारांचे प्रश्न सुटले का याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? : काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. विधिमंडळात महिलांना 8 मार्च रोजी बोलू दिले. मात्र, केवळ तेवढे सोपस्कार करून महिलांना प्रतिनिधित्व मिळणार नाही. केवळ एक दिवस महिलांना बोलू दिल्यानंतर उरलेल्या दिवसांमध्ये केवळ पुरुष आमदारांनी आपले म्हणणे मांडावे आणि महिलांनी श्रोत्याची भूमिका करावी हे योग्य नाही.
मतांचा आदर करायला पाहिजे : वास्तविक महिला आमदारांना बोलू देणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वपक्षीय प्रतोद आणि गटनेत्यांनी महिला आमदारांची नावे विधानसभा अध्यक्षांकडे दिली तरच महिला आमदारांना बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ सत्ताधाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही तर सर्व पक्षांनी आपापल्या पक्षातील महिला आमदारांच्या मतांचा आदर केला पाहिजे तरच त्यांना बोलायला मिळेल अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली.
सत्ताधारी पक्षातील आमदार काय म्हणाल्या? : भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी महिला आमदारांच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, या अधिवेशनामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात बोलायची संधी मिळते आहे. यापूर्वीचा आमचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. महिलांना सभागृहात बोलायची फारशी संधी मिळत नव्हती. मात्र, आता आपल्या मतदारसंघातील काही प्रश्न असतील किंवा महिलांच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर ते आम्ही सभागृहात मांडू शकतो. भले अजूनही आम्हाला तितकासा वेळ दिला जात नाही, परंतु या वेळेस गेल्यावेळी पेक्षा चांगली संधी मिळत आहे.
इतका वेळ महिलांना बोलायची संधी : आतापर्यंतच्या अधिवेशनांमध्ये महिलांना अभावानेच बोलण्याची संधी मिळत असे. मंत्री महोदय महिला आमदार किंवा वरिष्ठ महिला आमदारांनाच बोलण्याची संधी मिळत होती. मात्र, या अधिवेशनामध्ये दररोज दीड ते दोन तास महिला आमदारांना विविध विषयांमध्ये बोलायला संधी मिळते आहे. महिला आमदार लक्षवेधी प्रश्नोत्तरे आणि अवचित त्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात आपले म्हणणे मांडू लागले आहेत या पुढील काळात अधिक संधी मिळावी, अशी अपेक्षा आमदार हिरे यांनी व्यक्त केली.