मुंबई - लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही दिवसांपूर्वाच उपनगरीय रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्या चालवण्यात महिला चालक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मोटर वुमन मुमताज काझी आणि मनीषा म्हस्के-घोरपडे या कोरोना संरक्षणात्मक उपकरणांचा वापर करून उपनगरीय रेल्वे गाड्या चालवत आहेत.
![मोटर वुमन मुमताज काझी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-localwomen-7204426_20062020193537_2006f_1592661937_782.jpg)
कोरोना संकटाच्या काळात आपली जबाबदारी पार पाडत असताना, त्यांनी प्रवाशांना 'सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा' असा संदेश दिला आहे. पूर्ण सुरक्षा उपकरणांसह मोटारवुमन मनीषा म्हस्के-घोरपडे यांनी हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल उपनगरीय गाडी चालवली. मनीषा यांनी राष्ट्रसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले. त्यांच्याप्रमाणेच मुमताज काझी यांनीही ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे ही उपनगरीय गाडी चालवली.
![रेल्वेत विविध ठिकाणी महिला कोरोना योद्धा सेवा देत आहेत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-localwomen-7204426_20062020193537_2006f_1592661937_927.jpg)
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची उपनगरी रेल्वे गाड्यांमधून होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वेमधील महिला कोरोना योद्धा सेवा देत आहेत. मोटरवुमन, गार्ड, स्टेशन मॅनेजर, बुकिंग क्लर्क, तिकीट तपासणी व रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी तसेच ओएचई, ट्रॅक, सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, रेल्वे गाड्यांची देखरेख करण्यासाठी असलेल्या महिला कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सॅनिटायझिंग कामगार आदि फ्रंटलाईन स्टाफ उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये कार्यरत आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण कौतुकास्पद आहे.