मुंबई: पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मानखुर्दच्या मंडाला परिसरात शनिवारी सायंकाळी एका महिलेच्या डोक्यात गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
वादतून हत्या? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून घटनेतील आरोपी सोनू सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबासोबत फरजाना हीचा वाद सुरू होता. हा वाद पोलीस ठाण्यातही पोहचला होता. शनिवारी सायंकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर सोनू सिंह आणि त्यांचा मुलगा अतिष सिंह याने फारजानाला देशी पिस्तूलातून गोळ्या घातल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस आरोपींच्या मागावर: गोळीबाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करून फरजानाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर येथेही असाच हत्याकांड: अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी (18 फेब्रुवारी, 2020) रात्री पावणेदहाच्या दरम्यान दोन तरुणांनी सविता सुनील गायकवाड (वय-35) या महिलेवर तीन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. गोळीबारात महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नेमके कोणत्या कारणातून ही घटना घडली ही माहिती अद्याप समोर आले नव्हते.
वादातून गोळीबार: सविता सुनील गायकवाड (वय-35) असे या गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव असून आरोपींनी तीन गोळ्या झाडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले होते. पारनेर तालुक्यातील पारनेर-अलकुटी मार्गावर वडझिरे गावात सोमवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान एक ते दोन युवकांनी येऊन सविता गायकवाड यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात एका तरुणाने स्वतःकडील पिस्तुल काढून सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्याने एका पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोघे आरोपी पळून गेले. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमा झाले. त्यांनी सविता यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.