मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घ्यायचे की नागपूरमध्ये याचा पेच आज सुटणार आहे. विधानमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज दुपारी विधानमंडळात बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
अधिवेशन मुंबईत घेण्याचा आग्रह
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि दुसरीकडे विदर्भातील थंडीची लाट लक्षात घेऊन राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच घ्यावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून केली जात आहे. यासाठी काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी याविषयीची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे काही दिवसांपूर्वी केली होती. याच पार्श्वभूमीवर विधानमंडळाचे प्रधान सचिव तसेच विधान मंडळाचे अध्यक्ष यांनी नागपूर येथे जाऊन नुकताच आढावा घेतला. त्यानंतर उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत नागपूर येथील आढावा मांडून हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतले जावे, असा आग्रह धरला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात
राज्यात कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे, त्यातच उत्तर भारतामध्ये दिल्ली आदी ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊन पोहोचली असतानाच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे धोक्याचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नागपूरपेक्षा मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन घ्यावे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मात्र नागपुरात घ्यावे, असा विचारही समोर आला आहे. त्यामुळे उद्या दुपारी साडेतीन वाजता होत असलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाचा कालावधी कमी करणार
मुंबईत मागील महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनसुद्धा कमीत कमी वेळात घेतले जाण्याचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हे अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने घेता येईल का याचाही विचार उद्या होत असलेल्या बैठकीत केला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येते.