मुंबई - मराठी अभ्यास केंद्र गेल्या 15 वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहे. याअंतर्गतच शहरात दोन दिवसीय मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, मराठी शाळा आणि मराठी संस्कृती टिकावी यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याचे, आयोजक डॉ. दीपक पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा - 'प्रशासकीय कामकाजासह न्यायदानात मराठी भाषेचा वापर करा, त्यासाठी पैसे लागत नाहीत'
मराठी शाळा टिकून राहाव्यात तसेच मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. मराठी अभ्यास केंद्र इंग्रजी माध्यमांकडे जाणाऱ्या पालकांची पावले मराठी शाळांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. पवार म्हणाले. मराठी शाळेचे संचालक स्वत: इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करत आहेत. असे संचालक मराठी भाषेची कबर खोदत आहेत, असा आरोप डॉ. पवार यांनी केला आहे. या लोकांना मराठी अभ्यास केंद्र कायम विरोध करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.