मुंबई Wildlife Snake smuggling : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) वन्यजीव तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. केक आणि बिस्किटांच्या पाकीटमध्ये लपवून बँकॉकहून आणलेल्या विविध जातीच्या महागड्या सापांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं अटक केलीय. तसंच आरोपीविरोधात सीमाशुल्क, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
11 परदेशी प्रजातीचे साप करण्यात आले जप्त : मिळालेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी वन्यजीवांची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आरोपीच्या सामानाची तपासणी करण्यात आली असता त्यात नऊ अजगर (पायथन रेगियस) आणि दोन कॉर्न स्नेक (पॅन्थेरोफिस गट्टाटस) सापडले. सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत ते जप्त करण्यात आले. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त केलेले साप आणि अजगर परदेशातील असल्याचं समजलं. त्यामुळं आरोपीनं आयात धोरणाचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई 20 डिसेंबरला करण्यात आली.
सापांना पुन्हा बँकॉकला पाठवण्यात येणार : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार, या सापांना विमान कंपनीच्या (स्पाइसजेट एयरलाइंस) ताब्यात देण्यात आलं असून विमान कंपनीच्या मदतीनं त्यांना पुन्हा बँकॉकला पाठवण्यात येणार आहे. तर या परदेशी प्रजातींच्या सापांना मुंबईत घेऊन येणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. हे महागडे आणि दुर्मीळ साप नेमके कशासाठी भारतात आणण्यात आले होते. त्यांचा कशासाठी उपयोग करण्यात येणार होता. याबाबत काहीही माहिती अजूनही समजू शकलेली नाही. तपासाअंती या बाबी स्पष्ट होतील, असं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -