मुंबई- गेल्या वर्षी जुलै महिन्यात पवई परिसरातून बेपत्ता झालेल्या एका 31 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. निसार शिकूर शेख (वय 32), लल्लन तिवारी (वय 35) या असे आरोपींचे नावे आहेत.
हेही वाचा-'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?'
काय आहे प्रकरण...
पवई परिसरातून गेल्या वर्षी जुलै महिन्यात दिपाली राम नारायण यादव ही 24 जुलै 2019 रोजी हरवल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पवई पोलिसांनी याप्रकरणी शोधाशोध केली. मात्र, दिपाली आढळून आली नाही. पवई पोलिसांनी बेपत्ता महिलेच्या मोबाईलचा तांत्रिक अभ्यास करुन तिचा पूर्वीचा पती निसार शेखकडे अधिक विचारपूस केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी निसारची कसून चौकशी केली. यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
19 जुलै 2019 च्या रात्री गळा आवळून आरे जंगलात निर्जन ठिकाणी निसारने दिपालीची हत्या केली. तिचा मृतदेह मालाड येथील खाडीत फेकून दिला. या घटनेत त्याचा मित्र लल्लन तिवारी हा वाहनचालक होता. तो या सर्व घटनाक्रमातमध्ये त्याच्यासोबत असल्याने तोही या घटनेत सहभागी असल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा मृतदेह मालवणी पोलीस ठाण्यात आढळल्याने मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत महिलेची नोंद पवई पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याने हा गुन्हा पवई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पवई पोलीस करीत आहेत.