मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी राज्यात स्थापन करीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ३ महिन्यांची मुदतवाढ दिली. मात्र, 28 फेब्रुवारीला संजय बर्वे यांचा कार्यकाळ संपत असून महाविकास आघाडी आता मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाला पसंती देते, हे पाहण्यासारखे असणार आहे. माहितीनुसार ठाकरे सरकार मुंबई पोलीस आयुक्तपदी एक मराठी अधिकारी आणण्याचे ठरवत असून यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचेही नाव आता पुढे आले आहे.
सदानंद दाते यांनी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी सामना केला होता. ज्यात ते स्वतः हॅन्ड ग्रेनेडच्या हल्ल्यात जखमी झाले होते. जगात स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी बरोबरी होणारा मुंबई पोलीस विभाग असून देशात कुठल्याही पोलीस आयुक्तपदाला जेवढा सन्मान नसेल तेवढे मुंबई पोलीस आयुक्तपद हे मानाचे मानले जाते. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्याला त्याच्या कारकीर्दीत या पदावर काम करायला मिळावे, अशी इच्छा असते. मुंबई पोलीस आयुक्त कोण, याकडे अंडरवर्ल्ड डॉन, सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि अधिकारी यांचे लक्ष लागून आहे. तर, सेवा ज्येष्ठतेनुसार अनेक पोलीस अधिकारी मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या रेसमध्ये आहेत.
हेही वाचा - मराठी भाषा दिवस : अमराठी पालकांची मराठी शाळांना नवसंजीवनी, मराठी भाषिकांनी फिरवली पाठ
संजय पांडे - संजय पांडे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी असून आयआयटीत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. शिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार पांडे हेच मुंबई पोलीस आयुक्त पदाकरता अग्रस्थानी आहेत. याआधीच्या सर्व सरकारांनी पांडे यांना नेहमी डावललं आहे. मात्र, न्यायालयीन लढा लढत पांडे यांनी सर्व महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तर, याही सरकारशी पांडे यांची जवळीक नसल्याने ते मुंबई पोलीस आयुक्तपदी विराजमान होतील असं दिसत नाहीये.
परमबीर सिंग - परमबीर सिंग हे १९८७ बॅचचे आयपीएस आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केल्याने सिंग यांची वर्णी मुंबई पोलीस आयुक्तपदी लागण्याची दाट शक्यता आहे.
रश्मी शुक्ला - पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार तसेच विविध मोठी पदे भुषवलेल्या रश्मी शुक्ला या एकमेव महिला अधिकारी मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिली महिला आयपीस म्हणून त्यांची वर्णी लागण्याची जास्त शक्यता होती. मात्र, महाराष्ट्र बँक प्रकरणामुळे शुक्ला यांनी राज्यातील सरकारची नव्हे तर केंद्र सरकारची देखील नाराजी ओढवून घेतली होती. शिवाय त्यांची या सरकारशी जवळीकही नसल्याने त्यांचा याही वेळेस पत्ता कट झाल्यात जमा आहे. या सर्वांव्यतिरिक्त सेवा ज्येष्ठतेनुसार १९८६ बॅचचे एसपी यादव, संजय पांडे, १९८७ बॅचचे बिपीन बिहारी, सुरेंद्र पांडे, डी. कनकरत्नम, हेमंत नगराळे, १९८८ बॅचचे रजनीश शेठ, के. व्यंकटेशम यांनाही मुंबई पोलीस आयुक्तपदाची अपेक्षा आहे.
हेही वाचा - राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी सक्तीची, विधेयक एकमताने मंजूर