मुंबई - लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील ६ मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून विशेष व्हीलचेअर टॅक्सीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबविली जात आहे. त्यासाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटूंबियांनी “दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा संपूर्ण पत्ता, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादीतील मतदाराचा अनुक्रमांक” आदी तपशील लघुसंदेशाव्दारे (SMS) किंवा व्हॉट्सएप संदेशाव्दारे भ्रमणध्वनी क्रमांक ९३७२८१४२२१ किंवा votedivyang@gmail.com यावर पाठविल्यास वाहन नोंदणी केली जाणार आहे.
याबाबत दिव्यांग मतदारांना काही अधिक माहिती हवी असल्यास त्यासाठी दिव्यांग मतदार मदत केंद्राच्या दुरध्वनी क्रमांक ०२२-२०८२०९४५ यावर संपर्क साधावा. यापूर्वी दिव्यांगांनी या सुविधेसाठी नोंद केली असल्यास परत नोंद करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
अंध मतदारांसाठी ब्रेलपट्टी-
पूर्णपणे अंध मतदरांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानयंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असणार आहे. मदतनीसाने संबंधित मतदाराला त्या पट्टीची ओळख करून द्यायची आहे. नंतर ते स्वत: मतदान करतील अशी यंत्रणा आहे. तर दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मतदारांना व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दृष्टी कमी आणि मानसिक विकारग्रस्त मतदारांना मतदान करताना अधिक वेळ देण्यात येणार आहे.