मुंबई : दहशतवाद्याने बॉम्ब ठेवल्याचे खोटे फोन येत असल्याच्या घटना समोर येत असताना असाच प्रकार समोर आला आहे. मित्राची चेष्टा करण्यासाठी पाठविलेल्या मेसेजमुळे थेट प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गोव्यातून रमेश कुमार यादव (32 वय वर्ष) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
भांडुप परिसरात राहणारा सागर मोळावडे ( वय वर्ष 32 ) हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. 6 जुलैला रात्री आठ वाजताच्या दरम्यान काम संपवून घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये व्हाट्सअप तपासात असताना एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला. त्यामध्ये कल 9 बजे प्लॅनिंग हैं, पुरा ट्रेन पॅक होगा हमारे मनसुबे मुक्कम्मल होगे खुदा हाफिस असा मेसेज त्याला दिसला. त्याचा स्क्रीन शॉट काढून कोणीतरी मस्करी करत असल्याचे समजून सागरने त्याकडे दुर्लक्ष केले. धमकीचा मेसेजही त्याने डिलीट केला. त्यानंतर साडेआठ वाजता आणखीन एक मेसेज व्हाट्सअपवर आला. त्याचा देखील सागरने स्क्रीन शॉट काढून घेतला. त्या मेसेज मध्येही कल ट्रेन में भीड होगी, उसी दौरान काम को अंजाम देना है, असा मजकूर लिहिलेला होता.
नवीन सीमकार्ड घेऊन पाठविले मेसेज- अखेर भीती वाटल्याने सागरने मोबाईल क्रमांक ब्लॉक करत पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गोव्याहून सागरच्या मित्राला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी गोव्याहून तक्रारदाराच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. दोघेही वर्षभरापूर्वी एकत्र काम करत होते. याच दरम्यान त्याने नवीन सिम कार्ड घेतल्याने मस्करीत ते मेसेज त्याला पाठवले होते. तक्रारदाराने घाबरून कार्ड ब्लॉक केल्याने तरुणाशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. पोलीस त्याच्या घरी पोहोचल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे. बॉम्ब ठेवल्याचे धमकीचे खोटे कॉल अथवा सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट करण्यासारख्या प्रकारापासून तरुणांनी दूर राहावे, असे पोलीस वारंवार आवाहन करत असतात.
हेही वाचा-