मुंबई - आगामी महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करावेत, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत संवाद साधला.
राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. मात्र, या कामात लोकांचा सहभाग असेल तरच हा निर्णय यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे या मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस), स्काऊटस् अॅन्ड गाईडस्, स्पोर्टस् क्लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांना सहभागी करुन घ्यावे. प्लास्टिक बंद मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगावेत. यासाठी प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका काय करू शकते? याचा आराखडा येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, अशा सूचना आदित्य यांनी दिल्या.
हेही वाचा - तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी
या सर्व आराखड्यांचा सर्वंकष विचार करून संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल. यासाठी 1 मार्चला राज्यस्तरीय परिषद घेण्यात येईल. मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, असेही पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले.
प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता सिंगल यूज प्लास्टिकमुक्त चळवळीमध्ये लोकांना सामावून घेणे आवश्यक आहे. सिंगल यूज प्लास्टिकमुक्तीसाठी नवनवीन कल्पना मांडाव्यात. यासाठी राज्याचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सहकार्य करेल, असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
हेही वाचा - '...म्हणून मला कोणी 'डिग्री' विचारत नाही'
राज्यातील रस्ते, तलाव अशा सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक आढळून येते. या सार्वजनिक ठिकाणी पडलेले प्लास्टिक उचलून त्याचे व्यवस्थापन करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर कुमार श्रीवास्तव म्हणाले. विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीसाठी आपापल्या भागात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीरकुमार श्रीवास्तव, नगर विकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई. रविंद्रन उपस्थित होते.