मुंबई - मध्य रेल्वेने साई भक्तांच्या सुविधेसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दर शुक्रवारी धावणार विशेष गाडी -
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 02147 मुंबई-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस आता शुक्रवारपासून धावणार आहे. ही सुपरफास्ट एक्सप्रेस दर शुक्रवारी दादर येथून रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि साईनगर शिर्डीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तीन वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 02148 साईनगर शिर्डी-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस येत्या शनिवारपासून धावणार आहे. साईनगर शिर्डी येथून दर शनिवारी सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल आणि त्यादिवशी दादरला दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.
हेही वाचा - जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा आठवा क्रमांक
17 डब्याची असणार गाडी -
मुंबई-साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि कोपरगाव या स्थानकावर थांबा देण्यात आलेली आहे. मुंबई- साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेसला 17 डबे असणार आहे. त्याची संरचना 1 वातानुकूलित दुत्तीय, 2 वातानुकूलित तृतीय, 7 शयनयान आणि 7 दुत्तीय आसन श्रेणी असणार आहे.