मुंबई - केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संस्थांचा आधार घेऊन आमच्या लोकांची अडवणूक केली, त्रास दिला. मात्र, तरीही आमच्या काँग्रेसचे आमदार इतक्या मोठ्या संख्येने निवडून आले ही आमच्यासाठी सर्वात मोठी बाब असल्याचे मत, काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना व्यक्त केले. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत करण्यासाठी आज (गुरुवारी) टिळक भवन येथे काँग्रेसची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले.
पुढे खरगे म्हणाले, की राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या प्रश्नांशी समरस होऊन आमदारांनी ते सोडवण्यासाठी आता पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत. तसेच सध्या राज्यात पावसामुळे झालेले नुकसान आदी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न आमदारांनी आता सदनात घेऊन जा आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्या, असे नवनिर्वाचित आमदारांना सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट
सेना-भाजपकडून अजूनही सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जात नाही, यावर खरगे यांना विचारले असता ते म्हणाले, सेना-भाजपकडून सत्तास्थापनेसाठी काय करायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्हाला राज्यातील जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे, आणि तो कौल आम्हाला मान्य आहे. विरोधी बाकावर बसून राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आघाडीतील सर्वच पक्ष काम करत आहोत, असे आम्ही ठरवले आणि ते करत राहू असे खरगेंनी स्पष्ट केले.