मुंबई - येथील डोंगरी परिसरातील केसरबाई मेशन ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आता पर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी असून त्यांवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोसळलेली इमारत अधिकृत होती अनधिकृत याची चौकशी करून कारवाई करू, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी माध्यमांना सांगितले.
इमारत ज्या ठिकाणी कोसळली आहे त्या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे. कोसळलेली इमारत ही म्हाडा आणि मुंबई महापालिकेची नसून ती एका खासगी ट्रस्टची असल्याचा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांचा घटनास्थळी भेट देऊन स्पष्ट केले आहे. खोजा ट्रस्टच्या माध्यमातून ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र, ही इमारत अनधिकृत होती की अधिकृत होती हे चौकशीत समोर येईल, असे रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.