मुंबई : 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होत आहे. तसेच याबैठकीत ३१ ऑगस्टला 'इंडिया' आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार आहे. भाजपा सरकारच्या अत्याचाराविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीच्या नावाखाली एक वज्रमूठ बांधलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला हाकलण्यासाठी मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच ‘चले जाव’चा नारा दिला जाईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Nana Patole on Rahul Gandhi) (Nana Patole on INDIA Mumbai Meeting)
'इंडिया' आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल. परंतु काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत ही आमची सर्वांची भावना आहे - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
बैठकीला सोनिया गांधी यांची उपस्थिती : मुंबईतील गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्व आहे. 'एनडीए'मधील काही घटक पक्षही 'इंडिया' आघाडीत सहभागी होऊ शकतात. या बैठकीला नितीशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह ६ राज्यांचे मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत - 'इंडिया' आघाडीमध्ये पंतप्रधान पदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत. पण भाजपाकडेच या पदासाठी उमेदवारच नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. नरेंद्र मोदींना जनता कंटाळली असून, त्यांची लोकप्रियतासुद्धा झपाट्यानं घसरत असंल्याचं नाना पटोले म्हणाले. 'इंडिया' आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल. परंतु काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत ही आमची सर्वांची भावना आहे, असेही ते म्हणाले.
'ईडी'च्या धाकानं भाजपासोबत : राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले. ते ईडीच्या धाकामुळंच सत्तेत सहभागी झाले असून, विकासासाठी सत्तेत गेले नाहीत, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केलं असल्याचं नाना पटोले म्हणाले. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागील १७ वर्षांपासून सुरू आहे. तरीही हा रस्ता पूर्ण होत नाही. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली असून, भाजपाचे लोकच या रस्त्याच्या कंत्राटात भागिदार आहेत. तसेच कमीशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले आणि त्याचा फटका मात्र कोकणच्या जनतेला बसत आहे. याकरता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करावी म्हणजे, ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’ अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.
जनतेच्या पैशाची लूट : सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या अभियानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, या अभियानावर जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील योजनाच हे सरकार राबवत असून, त्याचं श्रेय मात्र स्वतः लाटत आहे. ज्या ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत, तिथली जनताच सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं.
हेही वाचा -
Nana Patole : काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार? नाना पटोले म्हणाले, आमचा पक्ष...
Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार; महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा