मुंबई: विदर्भ, मराठवाडा पाठोपाठ आता कोकणातही पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील खारघर येथे उष्माघाताने 14 जणांचा बळी गेला असतानाच उष्णतेचा पाणीसाठ्यावरही परिणाम झाला आहे. मराठवाड्याला अद्याप झळ बसली नसली तरी विदर्भ आणि कोकणावर जलसंकट ओढावले आहे.
ठाणे, रायगडमध्ये पाणीटंचाई: कोकणातील ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आदिवासी पाड्यांवर आणि वाड्या, वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील 31 गावे आणि 124 वाड्यांवर 30 खासगी टँकर मार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील 22 गावे आणि 52 वाड्यांवर 18 खासगी टँकर पुरविले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 16 गावे आणि 25 वाड्यांवर तीन शासकीय तर दोन खासगी टँकर मार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील पाणीटंचाईसुद्धा भीषण रूप घेत असून जिल्ह्यातील 15 गावे आणि 52 वाड्यांवर 25 खासगी टँकर मार्फत पाणी पुरविले जात आहे. एकूणच कोकणातील 84 गावे आणि 253 वाड्यांवर तीन शासकीय तर 75 खासगी टँकर मार्फत पाणीपुरवठा केला जात आहे.
विदर्भात पाणीटंचाईला सुरुवात: विदर्भात अद्याप तीव्र पाणीटंचाई जाणवत नसली तरी अमरावती जिल्ह्यातील 7 गावे, बुलडाणा जिल्ह्यातील 6 गावे आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 गावांमध्ये 15 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
उत्तर महाराष्ट्रातही पाणीटंचाई: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात 8 गावांमध्ये दोन शासकीय टँकरद्वारे तर अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात आणि पाच वाड्यांवर दोन शासकीय टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यातील एकूण 111 गावे आणि 269 वाड्या, वस्त्यांवर 11 शासकीय टँकर आणि 90 खासगी टँकरद्वारे पाणी पुरविले जात असून आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.