नागपूर : काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत स्वतंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता. आता कर्नाटक सरकारने आदेश देऊन त्यांनी वीर सावरकरांचा अभ्यासक्रमातला धडा काढून टाकला आहे. एवढेच नाही तर धर्मांतर बंदी कायदा रद्द केला आहे. भविष्यात गोहत्या बंदीचा कायदा रद्द करतील. काँग्रेसला दिलेले एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचे कर्नाटक उदाहरण आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लंडन मधूनच भूमिका स्पष्ट करावी की त्यांना कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकार मान्य आहे का, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे. उद्धव ठाकरेंनी कर्नाटकाच्या मुद्द्यावर आजच त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. एक मत काँग्रेसला आणि एक मत भाजपला काय करू शकतो हे कर्नाटकच्या प्रकरणावरून दिसून येत आहे असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांना योग्यवेळी उत्तर देऊ : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तेपासून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे समीकरण राहिले आहे. अजित पवारांनी सरकार बद्दल आरोप करणे म्हणजे सरकार योग्यवेळी उत्तर देईल. दीपक केसरकर यांनी अजित पवारांना जी ऑफर दिली आहे, त्याचे उत्तर अजित पवारांनी दिलेले बरे.
आशिष देशमुख संघटनात्मक काम करतील : आशिष देशमुख यांनी राहुल गांधींच्या ओबीसी विरोधी भूमिकेबद्दल प्रश्न विचारले, म्हणून नाना पटोलेनी त्यांना पक्षातून काढून टाकले. जर ओबीसींबद्दल मत मांडणे काँग्रेसमध्ये चुकीचे असेल आणि पक्षातून काढले जात असेल तर भाजप ओबीसीच्या सन्मान करतो. यावेळेला आशिष देशमुख यांनी पद किंवा उमेदवारी मागितलेली नाही ते संघटनात्मक काम करण्यासाठी येत आहेत. तेलंगणातील BRS मॉडेलमध्ये किती चुका आहेत याचा व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊ, असेही ते म्हणाले.
आमच्यातील वाद मिटले आहे : नुसती चर्चा आहे,आम्ही कुठलाही सल्ला दिलेला नाही. तणाव मुळीच नव्हता. कोणीतरी जाहिरात दिली, म्हणून चर्चा सुरू झाली, भावना व्यक्त झाल्या. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते असून त्यांना महाराष्ट्राचा हित कळते. त्यामुळे ते लहान सहान गोष्टीला थारा देणार नाही. अशा जाहिरातींनी कुणाची उंची वाढत नाही, कोणाची उंची कमी होत नाही. आता आम्ही जाहिरातीच्या प्रकरणापासून पुढे गेले आहो. फडणवीस आणि शिंदे विचारांनी एक आले आहे.
फडणवीस महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते : आमचे केंद्रीय नेतृत्व कधीही कोणाची उंची जास्त किंवा कमी करत नाही. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला औकात नसताना राज्याचा अध्यक्षपद दिले आहे. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. कधी- कधी जनतेच्या भल्यासाठी राज्याच्या हितासाठी काही भूमिका स्वीकाराव्या लागतात. आम्ही बहुमताने आलो होतो. राज्याची जनतेने फडणवीस यांना मान्य केले होते. मात्र, आमच्या सोबत दगाबाजी झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहे. हे 2014 आणि 2019 मध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यासाठी कोणीही काम करत नाही. त्यामागे आमच्या नेत्यांचा हात आहे हे बोलणं चूक आहे.
कितीही खर्च झाला तरी चालेल : शासन आपल्या दारी हे प्रत्येक गावापर्यंत गेले पाहिजे. त्यामुळे यावर आणखी खर्च झाला तरी योग्य आहे. या राज्यातील कोणताही व्यक्ती राज्य सरकारच्या योजना शिवाय राहू नये. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तिगत विधान आहे. उद्धव ठाकरेंसाठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही. आमची त्यांच्याशी कुठलीही चर्चा सुरू नाही असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा - Devendra Fadnavis Reaction : लोकांच्या मनातून सावरकर काढू शकत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल