मुंबई - मतदान करा आणि मतदान केंद्रातच सेल्फी काढा, अशा प्रकारची ऑफर देत निवडणूक आयोगाने सखी या मतदान केंद्रांवर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदान केंद्रात मोबाईल बंदी असल्याने सेल्फी काढण्याची आयती संधी असतानाही असंख्य मतदारांची यामुळे मोठी पंचाईत झाली. तर सेल्फीची संधी हुकल्याने मुंबईतील मतदारांच्या मनाला हुरहूर लागून राहिली असल्याचे दिसून आले.
मुंबईत असलेल्या ६ लोकसभा मतदार संघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदारसंघात सखी मतदान केंद्र उभारण्यात आले. यात आकर्षक अशी सजावट करून ते ठिकाण संपूर्ण महिला कर्मचारी यांच्या हातात सोपवण्यात आली होती. त्यातच मतदान केल्यानंतर मतदाराला आपला सेल्फी काढण्यासाठी खास एक फ्रेम तयार करण्यात आली होती. त्यात मतदाराने जाऊन सेल्फी काढावी, अशी योजना करण्यात आली होती. मात्र, मतदान केंद्र आणि त्या परिसरात मोबाईल बंद ठेवण्यात आल्याने असंख्य मतदारांना मुंबईत सेल्फी काढता आले नाही.
दुसरीकडे अनेक नट, नट्या, चित्रपट सृष्टीतील कलावंत यांना मात्र सखीच्या विविध केंद्रावर आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सेल्फी काढण्याची मुभा देण्यात आली होती. इतकेच नाही तर काही ठिकाणी स्वतः आयोगाचे अधिकारी हे सेल्फी काढून त्यात या मतदारांना पाठवण्याची व्यवस्था करत होते. वर्सोवा येथील सखी मतदार केंद्रात अशाच प्रकारची सुविधा करण्यात आली होती. त्याठिकाणी सकाळपासून चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आलिया भट, सुप्रिया पाठक आदींनी येऊन सेल्फी काढली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इतर मतदारांकडून पाहिजे तसा प्रतिसाद आम्हाला मिळाला नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
काही महिला अधिकारी म्हणाल्या, आम्ही मतदान केंद्रात मतदान करताना मोबाईलला परवानगी दिली नव्हती. मात्र, सेल्फी काढण्यासाठी आम्ही त्यांना मुभा देण्याचे सांगत होतो. परंतु महिलांनी आणि इतर मतदारांनीही त्यासाठी पुढाकार घेतला नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगता सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदारांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी मुंबईतील अनेक मतदारसंघात सखी नावाचे स्वतंत्र, असे मतदान केंद्र आयोगाकडून तयार करण्यात आले. त्यात मतदान केल्यानंतर मतदारांना कोकम सरबत आणि महिला मतदारांना सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले.