मुंबई - एखादया नागरिकाला त्याचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे पुरेसे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान म्हटले आहे. जन्माचा दाखला, निवासी दाखला, मूळ निवासी दाखला यांच्यासह पासपोर्ट अशा प्रकारचे पुरावे हे नागरिकत्व सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
2017 मध्ये भारतत अनधिकृतरित्या प्रवेश करून मुंबईत राहण्याच्या आरोपाखाली अब्बास शेख (वय 45), राबिया खातून शेख (वय 40) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या विरोधात या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ते भारतीय असल्याची सर्व कागदपत्रे सादर केली. मात्र, या दरम्यान सरकारी वकिलांकडून ही कागदपत्रे बनावट असल्याचे सांगण्यात आले. कागदपत्र बनावट असल्यास ते सिद्ध करा, असे न्यायालयाने म्हटल्यावर सरकारी पक्ष ते सिद्ध करू न शकल्याने उच्च न्यायालयाने दोन्ही याचिकाकर्त्यांची निर्दोष सुटका केली.
हेही वाचा - अंधेरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना दुर्घटना; रेल यात्री परिषदेची कारवाईची मागणी
दरम्यान, कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा रेशन कार्ड यांच्यामुळे नागरिकत्व सिद्ध होत नाही. कारण नागरिकत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने ती बनविण्यात आलेली नाहीत. केवळ जन्म दाखला, निवासी दाखला, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र हे नागरिकत्व सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.