मुंबई: मंत्रालयात (Mantralay) मुख्यमंत्री कार्यालयात भेटीसाठी (CM office visiting time) आता फक्त २ ते ४ ची वेळ मिळणार आहे. (Mantralay Visiting Time). मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील दालनात वाढणारी प्रचंड गर्दी हे या मागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.
दुपारी २ ते ४ प्रवेश: मंत्रालयात यापुढे अभ्यागतांना दुपारी २ ते ४ च्या दरम्यानच मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश दिला जाईल. तसेच आमदारांच्या गाडीतून आता केवळ स्वीय सहाय्यकालाच मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या कार्यालयात असलेल्या सहाव्या मजल्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. सामान्य जनतेचे सरकार असे म्हणत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला मंत्रालयात प्रवेश दिला होता. परंतु त्यामुळे मंत्रालयात वाढणारी गर्दी पाहता आता या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मंत्रालयातील आणि मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी प्रचंड गर्दी: मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी असलेले चारही दरवाजे दुपारी दोन वाजेपर्यंत आतून बंद केले जाणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर प्रचंड गर्दी जमायची. मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना काम करणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही: मंत्रालयात येणारे सरकारी कर्मचारी, मंत्रालयातील अधिकारी, बाहेरून मंत्रालयात येणारे अधिकारी, पत्रकार यांना यापुढे ओळखपत्रा शिवाय आत प्रवेश मिळणार नाही. या नियमाची आता अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.