मुंबई : सावरकर मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना, भाजप खूप आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या एका सभेदरम्यान सर्व चोरांची नावे मोदी असतात, असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आपली खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्याकडून आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये माझे नाव राहुल गांधी आहे, मी सावरकर नाही. मी माफी मागणार नाही. असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांच्यावरती राजकीय पक्षांकडून टीका केली जात आहे.
सावरकरांकडून निषेध : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सावरकर यांनी माफी मागितली असल्याचे पुरावे दाखवा, असे आवाहन त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर राहुल गांधी जे काही बोलत आहेत, ती बालिशपणाची वक्तव्ये आहेत. देशभक्तांच्या नावाचा वापर करून राजकारण करणे निषेधार्ह असल्याचे सावरकर यांनी म्हटले आहे. समाज माध्यमांवर राहुल गांधीचा निषेध केला जात आहे.
शिवसेनेकडून कानपिचक्या : राहुल गांधी यांच्यावर टीका होत असताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरू नये, असे ठणकावून सांगण्यात आलेले आहे. राहुल गांधी यांच्या विषयावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत.
राज्यात सावरकर यात्रा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याने राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात 'वीर सावरकर गौरव यात्रा' काढली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर, फेसबुक प्रोफाईलचा फोटोही बदलला आहे. 'आम्ही सारे सावरकर' अशा आशयाचे कॅप्शन फोटो शिंदेंनी प्रोफाईलला ठेवले आहे.