मुंबई - केंब्रिज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठामध्ये ऑनलाइन परीक्षा घेऊन पास करण्यात आलेले आहे. याबाबत शरद पवारांना माहीत नसेल असे नाही. पण आपल्या सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे झाकण्यासाठी घटनात्मक सर्वोच्च असलेल्या राज्यपालांवर टीका करणे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटण्यासारखे नाही. पवार साहेबांकडून मला अपेक्षित नाही. मी केवळ वास्तव समोर आणलेले आहे, की केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये पदवीच्या ऑनलाइन परीक्षा घेऊन निकाल देण्यात आला आहे. या सरकारला असंच करायचं नसेल तर नका करू. ४५ टक्के विद्यार्थ्यांना नापास करा, सरकार तुमचे आहे. पण घटनात्मक सर्वोच्च असलेल्या राज्यपालांवर टीका करणे, हे चुकीचे आहे, असे प्रत्युत्तर माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. परंतु, या परीक्षा घेण्यात याव्यात, यावर ठाम असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मात्र हा निर्णय पटलेला नाही. राज्य सरकारने याबाबत मनमानी केल्याचं म्हणत कोश्यारी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यावर कदाचित राज्यपालांना ऑक्सफर्डपेक्षाही जास्त ज्ञान आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यालाच आता विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे चुकीचा आहे हे ऑक्सफर्ड, केंब्रिज, युनायटेड स्टेट, आयआयटीयासारखे सर्व उच्च विद्यापीठ आहे, ते विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेत आहेत. तसेच वर्षभर ते प्रश्नमंजुषा, वेगवेगळ्या असाइन्मेंट याद्वारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल त्यांनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे वास्तव आहे. पण आपल्या राज्यात हे असं न करता, परीक्षा न घेता सरसकट विद्यार्थ्यांना पास केले जाते. त्यामध्ये 45 टक्के विद्यार्थी नापास होणार आहेत. यातून आपण काय साध्य करणार आहोत? असा सवाल तावडे यांनी उपस्थित केला आहे.