मुंबई - मनसेच्या हिंदुत्वामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. राजकीय वर्तुळात आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येईल, अशी चर्चा जरी असली तरी यात तथ्य नाही, असेही तावडे यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा नव्या भगव्या रंगाच्या ध्वजाचे अनावरण केले. तसेच मनसेच्या पोस्टर्समध्ये महाराष्ट्र धर्माचा आणि हिंदवी स्वराज्याचा जयघोष करण्यात आला आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाकडे झुकत नव्याने राजकारण करण्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आहेत.
हेही वाचा - वांद्र्यात शिवसेनेच्या जल्लोषाची जोरदार तयारी
यावर प्रतिक्रिया देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्ववादी मतांचे राजकारण आहे. धर्मनिरपेक्ष मतांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा समावेश होतो. तर हिंदुत्ववादी मतांमध्ये भाजप आणि शिवसेना आहे. आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून सत्ता मिळवली असल्याने हिंदुत्ववादी मतं सेनेपासून दूर गेली आहेत. ही हिंदुत्ववादी मतं थेट भाजपच्या पारड्यात जाऊ नयेत, याची काळजी चाणक्य शरद पवार घेत असल्याचे तावडे यांनी सांगितले.
सेनेपासून दुरावलेल्या हिंदुत्ववादी मतांना मनसेकडे वळवून भाजपला धक्का देण्याचा हा प्रकार असल्याचेही तावडे म्हणाले. मनसेने हिंदुत्ववादी राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी भाजप आणि मनसेच्या विचारधारेत मोठा फरक असल्याने हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.