मुंबई - राज्यात १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील आणि १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच वर्तवला होता. त्यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटील हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा टोला लगावला आहे.
राज्याचे महसुलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी निवडणुकीची आचार संहिता १५ सप्टेबंरला लागेल, असे माध्यमांना सांगितले. निवडणुका कधी होणार? आचार संहिता कधीपासून जाहीर होणार ही बाब निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून त्यांना घटनात्मक अधिकार आहेत. चंद्रकातदादा पाटील हे काय निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत काय? की त्यांना प्रतिनियुक्तीवर तेथे पाठविले आहे काय? असा प्रश्न त्यांनी विचारला. मंत्री महोदयांना निवडणुकीबाबत माहिती मिळाली ? निवडणूक आयोगाकडून माहिती लीक होते का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी १५ ते २० ऑक्टोबर दरम्यानच विधानसभा निवडणूक होईल, असे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात 'फिर एक बार शिवशाही सरकार' ही यात्राही काढण्यात येणार असल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्यात ही यात्रा काढली जाणार, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले होते.