मुंबई - वर्षभरापूर्वी राज्यात विरोधीपक्ष नेता केले असते तर या सेना-भाजपच्या लोकांना त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सळो की पळो करून सोडले असते, अशी खंत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत व्यक्त केली. तसेच आता उशीर झाला असला तरी आता राज्यात दोन 'विजय' काँग्रेसची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले.
नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काँग्रेसने नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
आज सेना भाजपच्या खेकड्यांच्या भ्रष्टाचाराने संपूर्ण राज्य पोखरले गेले आहे. या लोकांची अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणे आहेत. ही प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्ते हातात हात घालून कायम राहायला पाहिजे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून घालवता येईल, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच काँग्रेस मुक्त करण्याचे विधान केले होते. त्यावर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, कोण म्हणतो काँग्रेस मुक्त करू. मात्र, मी त्यांना सांगतो की त्या लोकांच्या सात पिढ्या गेल्या तरी काँग्रेस मुक्त करू शकत नाही. कारण हे लोक अखंड भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा पराजय होणार आहे. यामुळेच राज्यात आता काँग्रेसची धुरा सांभळण्यासाठी दोन 'विजय' आले असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी प्रभावीपणे सांभाळणार आहे. मात्र, याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकांनी राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकावयाचा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा करा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.