मुंबई - मुंबई पोलिसांनी दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फडणवीस, दरेकर आणि पोलीसांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण -
दमणच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अचानक ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या मालकाला विलेपार्ले पोलीस ठाण्यात काही वेळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना बीकेसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. फडणवीस आणि दरेकर यांनी रात्री उशीरा पोलिसांशी याबाबत चर्चा केली व कंपनी मालकाच्या अटकेबाबत विचारणा केली. विरोधी पक्षाच्या आवाहानावर महाराष्ट्राला रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यास तयार झाल्याने डोकानिया यांच्या विरोधात कट रचून कारवाई करण्यात आली. कुठलाही साठा नसताना, दखलपात्र गुन्हा नसताना बोलविण्यात आल्याची कबुली पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे काही दिवसांपूर्वी दमनला ब्रुक फार्मा कंपनीमध्ये गेले होते. तिथे त्यांनी रेमडेसीवीरची ५० हजार इंजेक्शने बुक केल्याचे सांगितले होते.