मुंबई: वर्सोवा ते विरार हे अंतर केवळ 45 मिनिटांत पार करता यावे आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी. यासाठी वर्सोवा ते विरार सी लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदेनुसार प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करणे, बांधकामासाठीच्या पूर्व निविदा आणि निविदेनंतरची प्रक्रिया पार पाडणे, यासाठी सल्लागरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
३३ हजार कोटींचा प्रकल्प
पश्चिम उपनगरातून रस्ते मार्गे विरारला जाण्यासाठी दोनपेक्षा अधिक तास लागतात. त्यात वाहतूक कोंडीचा त्रास ही सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे हे अंतर भविष्यात केवळ ४३ मिनिटांत तेही सिग्नल विरहित पार करता येणार आहे. दरम्यान हा सी लिंक ४३ किमीचा असून यासाठी ३३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या सी लिंकला चार कनेक्टर्स असतील. म्हणजेच चार ठिकाणाहून सी लिंकवर येता येईल व बाहेर पडता येईल. त्यानुसार चारकोप, उत्तन, वसई आणि अर्नाळा असे हे चार कनेक्टर असतील. तर येण्यासाठी ४ आणि जाण्यासाठी ४ अशा ८ मार्गिकेचा हा सी लिंक असणार आहे.
सहा महिन्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता
या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी तसेच निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठीच गुरुवारी (आज) एमएसआरडीसीने निविदा मागवली आहे. सल्लागार नियुक्त झाल्यानंतर येत्या सहा महिन्यात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे. तर कामाला सुरुवात झाल्यानंतर ५ वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहीती आहे.
हेही वाचा-'खलनायकही ताकदीचा लागतो! पुढील साडेतीन वर्ष विरोधकांनी अशीच भूमिका साकारावी'
हेही वाचा- नागपुरात 15 ते 21 मार्च टाळेबंदी, पालकमंत्री राऊत यांची घोषणा