मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. मात्र त्यानंतरही नागरिक भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या घाटकोपर विभागात आठवड्यातून 2 दिवस भाजी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. अशीच परवानगी मुंबईत सर्व ठिकाणी दिली जाणार असल्याने मुंबईकरांना आठवड्यातून दोन दिवसच भाजी घेता येणार आहे.
मुंबईत रोज नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत कोरोनाचे एकूण 775 रुग्ण आढळून आले आहेत. 54 जणांचा मृत्यू झाला असून 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमध्ये रोज रुग्ण आढळून येत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन असला तरी नागरिक रोज भाजी घेण्यासाठी गर्दी करत होते. नागरिकांची गर्दी कमी करता यावी म्हणून पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागाने एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार एन विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या पंत नगर, पार्क साईट, घाटकोपर, टिळक नगर या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरसेवक आणि व्यापारी यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत फक्त सोमवार आणि गुरुवार याच दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजी आणि फळ विक्री करता येणार आहे.
इतर दिवशी भाजी किंवा फळ विकणारा आणि विकत घेणारा या दोघांवर सरसकट साथ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. याच परिपत्रकाप्रमाणे मुंबईमध्ये इतर विभागातही याच प्रमाणे अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे आता मुंबईत सर्वत्र आठवड्यातून दोनच दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत भाजी आणि फळे मिळणार आहे. त्याव्यतिरिक्त भाजी आणि फळे विकल्यास किंवा विकत घेतल्यास विक्रेते आणि नागरिकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.