मुंबई - राजधानी मुंबईमधील रस्त्यांच्या कामाबाबत पालिकेने धोरणात बदल केल्याने बहुतांश रस्त्यांची कामे रखडली आहेत. दहिसर येथीलही कामांचा त्यात समावेश आहे. या विभागातील रस्त्यांची कामे डांबरा ऐवजी सिमेंट काँक्रीटने करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कारणाने कामांचा किंमती वाढल्याने याची चौकशी पालिकेच्या व्हिजिलन्स विभागाकडून केली जात आहे. रस्त्यांची कामे रखडल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे विधी समितीच्या अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी सांगितले.
मुंबईतील रस्त्यांचा विषय गेले काही महिने चर्चेचा विषय बनला आहे. पालिकेने रस्त्यांच्या कामात धोरण बदलल्याने रस्ते कामांची कंत्राटे वादात सापडली आहेत. प्रशासनाच्या धोरणावर सर्व पक्षीय नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची 20 टक्के रक्कम पालिका आपल्याकडे सुरक्षा ठेव म्हणून ठेवायची. रस्त्यांचा हमी कालावधी संपल्यावर ही रक्कम कंत्राटदारांना परत दिली जायची. त्यात बदल करून सुरक्षा ठेवेची रक्कम 20 टक्क्यांऐवजी 40 टक्के रक्कम पालिकेकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डांबरी रस्ते बनवण्या ऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील बहुतांश रस्त्यांची कामे रखडली आहेत.
दहिसरमधील रस्त्यांची कामे रखडल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार विलास पोतनीस व शिवसेना नगरसेवक यांच्या उपस्थित एक बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान दहिसर आर उत्तर विभागातील नऊ रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार होते. त्यात बदल करून सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. 9 ते 10 महिने झाले तरी अद्याप या रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. डांबरी रस्ते सिमेंट काँक्रेटचे करण्याचा निर्णय घेतल्याने कामांच्या रक्कमेत वाढ झाली आहे. यामुळे पालिकेच्या व्हिजलन्स विभागाकडून चौकशी केली जात आहे, अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.
डांबरी रस्ते आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते या कामाच्या खर्चात तफावत आहे. प्रशासनानेच सिमेंट काँक्रीटचा निर्णय घेतला असल्याने कामाची रक्कम वाढली आहे. असे असताना व्हिजलन्स चौकशी केली जात आहे. या चौकशीतून काय निष्पन्न झाले ते अद्याप सांगण्यात आलेले नाही. रस्त्यांची कामे रखडली असल्याने महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी डांबरी रस्ते करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच प्रकरणी पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत 24 फेब्रुवारीला पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.
हेही वाचा - एसटी चालकामळे मुलीचा पाय गमावला; कुटुंबियांची महामंडळाकडे पुर्नवसनाची मागणी