मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत 23 हजारहून अधिक कोरोना योद्ध्यांना लस टोचण्यात आली आहे. तर, आता लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे. कारण, आता सेव्हन हिल्स रुग्णालयात 15 युनिट्सचे लसीकरण केंद्र कालपासून सुरू करण्यात आले असून, पहिल्या दिवशी 300 हून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. तर, आता उद्यापासून गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्येही दोन युनिट्स सुरू होणार आहेत.
15 ही युनिट्समध्ये लसीकरण
आतापर्यंत मुंबईत 9 लसीकरण केंद्र असून यात 72 युनिट्स आहेत. तर, कालपासून यात सेव्हन हिल्समधील 15 युनिट्सची भर पडली. मुंबई महानगर पालिकेच्या निर्देशानुसार या रुग्णालयात 15 युनिट्स तयार करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्या हस्ते काल (बुधवारी) या केंद्राचे उद्घाटन झाले.
हेही वाचा - उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'ड्रायव्हरलेस मेट्रो'चे अनावरण
पहिल्याच दिवशी 300 हून अधिक जणांना लस टोचण्यात आल्याची माहिती डॉ. अडसूळ यांनी दिली. महत्वाचे म्हणजे, या केंद्रातील सर्वच्या सर्व 15 युनिट्स सुरू आहेत. हे केंद्र सुरू झाल्याने आता अंधेरी-मरोळ परिसरातील कोरोना योद्ध्यांची मोठी सोय होत आहे.
सोमवारपासून नेस्कोत 10 युनिट्स होणार सुरू
सेव्हन हिल्समध्ये कालपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आता नेस्को कोविड सेंटरही लसीकरण मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. नेस्कोत 10 युनिट्स तयार करण्यात आले असून यातील दोन युनिट्स उद्यापासून सुरू होतील, अशी माहिती नेस्को कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी दिली. तर, सोमवारपासून उर्वरित 8 युनिट्स सुरू होऊन 10 ही युनिट्सद्वारे लसीकरण सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या पत्नीला ईडीचे समन्स